9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

थोडावेळ काढला पाहिजे. प्राण्या-पक्षां साठी, नद्या- नाल्यां साठी, अनवट पायवाटां साठी, दऱ्याखोऱ्यां साठी. एकसुरी चालणाऱ्या दिनक्रमात कधी कोणी पाहुणा आला कि तो दिवस जास्त आनंद देऊन जातो. जंगलातल्या प्राणी-किड्यांना, बेडुक-पक्षांना पण अस नक्की वाटत असेल कि सोमवार ते शनिवार केलेला रियाझ रविवारी येणाऱ्या रसिक भटक्यां समोर सादर करावा, सुरेल मैफिलीने त्यांचे कान तृप्त करावे. धबधब्याला वाटत असेल कि आपल्या धीर गम्भीर आवाजाने आणि कोसळणाऱ्या पाण्याने सर्वांच्यात अन्तर्र्बाह्य (मनात) साचलेली मलिनता धुऊन काढावी.

दऱ्या- खोरी आसुसली असतील त्यांच्यात नांदणारी शांतात आपल्याला ऐकवण्या साठी. आधी सुलतानी ला आणि नंतर आस्मानी संकटांना तोंड देत उभे असलेले तट बुरुज, गावागावात, अनेक किल्ल्यांवर विखुरलेली ‘वीरगळ’ प्रतीक्षेत असतील आपल्या पुर्वजांचा गौरवशाली इतिहास सांगुन आपल्यात स्फुल्लींग चेतवायच्या. काळिमाती प्रयत्नात असेल सिमेंटीकरणा मुळे तुटलेली आपली नाळ परत एकदा जोडण्याच्या. अनवाणी पायांनी, सुटणारी अर्धी चड्डी सावरत तारेची गाडी करून चालवणारी खेड्यातली छोटी उघडी बागडी पोर वाट पाहत असतील शहरातील पांढरपेशी मुलांना खरा आनंद कशात आहे हे शिकवण्यासाठी. सारख घरातल्या डासांनाच किती वेळा रक्तदान करायच, कधी जंगलातल्या डासांनापण रक्त पाजुन तृप्त केल पाहिजे.

काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हि जगरहाटी नाही तर हा एक वैश्विक नियम आहे. आठवड्याचा एक दिवस खर्ची घालुन आडवाट जवळ केली पाहिजे. पाव्ह्न होऊन ह्या सर्वांना आनंद दिलापाहिजे. कारण हाच एक दिवस पुढच्या सहा दिवसांकडे positively पहायला शिकवणार आहे.